
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षासाठी राज्यातील 20 जागा जिंकण्याचा मार्ग सोपा करून ठेवला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, आम्हालाही राजकारण कळतं, अशा शब्दात आंबेडकर यांना चिमटा काढला आहे. मात्र, त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी साठी महाविकास आघाडीचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे आणि हुकुमशाही धडका मारते आहे. अशावेळी आंबेडकर यांनी आमच्या सोबत असावे, यासाठी आम्ही त्यांच्यासमोर प्रेमाने हात जोडले. महाविकास आघाडी त्यांना सहा जागा देऊ केल्या. मात्र, त्यांचे विचार, भूमिका आणि निर्णय वेगळा होता. त्याची दखल सर्व देश घेत आहे, असेही राऊत म्हणाले.
मराठवाड्यात महाविकास आघाडीची ताकद बघता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह चारही लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना निवडणूक जड जाणार, असा दावाही राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाणे सगळीकडे चालते असे म्हणतात. प्रत्यक्षात मोदी हे दोन हजार रुपयांची बंदी घातलेली नोट बनले आहेत. ती यापुढे देशात चालणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.