लायन्स क्लब, वनराई आयोजित आदर्श गाव प्रकल्पाचे विजय भंडारी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : प्रतिनिधी
“संयुक्त राष्ट्राने दिलेली शाश्वत विकासाची १७ ध्येये पूर्ण झाली, तर विकासाचे उद्दिष्ट्य साध्य होईल. खेड्यापाड्यांच्या विकासासाठी हा महत्वाचा उपक्रम आहे. गावांचा विकास व्हायचा असेल, तर लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. सक्रिय लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला, तर गावागावांत परिवर्तनाची नांदी होईल,” असे मत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे (यशदा) उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२, वनराई आणि सोसायटी फॉर सोशल इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट (एसएसआयडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गाव प्रकल्पाचे उद्घाटन लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या हस्ते झाले. मित्र मंडळ चौकातील वनराई संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, आदर्श गाव प्रकल्पाचे समन्वयक लायन अनिल मंद्रुपकर, लायन शेखर शेठ, लायन्स क्लबचे प्रांत मुख्य कार्यकारी अधिकारी लायन श्याम खंडेलवाल, प्रांत खजिनदार लायन राजेंद्र गोयल, लायन सतीश राजहंस, लायन आनंद आंबेकर, लायन प्रमोद उमरदंड आदी उपस्थित होते.
आदर्श गाव प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यशाळेला १२ गावांचे सरपंच व पदाधिकारी सहभागी झाले होते. लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर, लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट, लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर, लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री, लायन्स क्लब ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी, लायन्स क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा, लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलॅक्सी, लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम, लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट, लायन्स क्लब ऑफ तळेगाव, लायन्स क्लब ऑफ पूना कोथरूड या क्लब्जनी या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, “गावात कोणताही उपक्रम राबविताना तेथील लोकांचा सहभाग, प्रत्येक घटकाला सामावून घेतले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेले शाश्वत विकासाची उद्दिष्टे २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. लायन्स क्लबचे सामाजिक कार्य आणि काम करण्याची पद्धती संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांप्रमाणेच आहे. त्याला गावकऱ्यांची साथ मिळाली, तर हा प्रकल्प लवकर साकार होईल.”
लायन विजय भंडारी म्हणाले, “गावासाठी काही तरी करण्याची इच्छा उराशी बाळगून आज येथे १२ गावांचे पदाधिकारी आले आहेत. त्यांचे कौतुक करायला हवे. ‘खेड्याकडे चला’ हा संदेश तरुणांमध्ये रुजविण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी लायन्स क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गावांना व शाळांना पाण्याच्या टाक्या, स्वच्छता, शौचालय, वृक्षारोपण, कौशल्य प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. लायन्स क्लबने हाती घेतलेला आदर्श गाव प्रकल्प निश्चितपणे परिवर्तनाचे एक उदाहरण म्हणून समोर येईल.”
रवींद्र धारिया म्हणाले, “इकॉलॉजी (पर्यावरण), एम्पॉवरमेंट (सक्षमीकरण) आणि इकॉनॉमी (अर्थव्यवस्था) या तीन ‘ई’वर वनराई काम करत आहे. सामाजिक संस्थांनी, आदर्श गाव होऊ पाहणाऱ्यांनी या तीन गोष्टींवर लक्ष दिले, तर गावांत आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही.”
लायन अनिल मंद्रुपकर यांनी प्रास्ताविकात आदर्श गाव प्रकल्पाच्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. योगेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. शेखर शेठ यांनी आभार मानले.