
शरद पवार यांचा घणाघात
पुणे: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. मोदी आणि भाजप देशातील लोकशाही उध्वस्त करून देशात हुकूमशाही आणणार आहेत. त्यामुळे देशातील मतदारांनी या निवडणुकीत अधिक सजग राहून मतदान करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते. या सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्यासह घटक पक्षांचे अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात दीर्घ काळापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यावरूनच राज्यकर्त्यांची वाटचाल कुठे चालू आहे हे दिसून येते. यांना शक्य झाले तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाही हे टाळण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला वाटेल तसे वागता यावे, संविधान बदलता यावे यासाठीच यांना 400 हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.
मोदी आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसचा त्याग केलेले नेते अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र, तेच चव्हाण आता भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. मोदी यांनी ज्या लोकांवर बँक आणि सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, ते लोक आता कुठे आहेत, अशा शब्दात पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले जे नेते भाजपच्या बाजूला गेले, त्यांना त्यांच्यात सामावून घेतले गेले. मात्र, ज्यांनी त्यांच्या धाक दुपटशाला दाद दिली नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी गजाआड केले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मतदारांनी सजग राहण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली.