Home India लैंगिक छळाला कंटाळून महिला न्यायाधीशांनीच केलेल्या इच्छामरणाच्या मागणीची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल

लैंगिक छळाला कंटाळून महिला न्यायाधीशांनीच केलेल्या इच्छामरणाच्या मागणीची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल

लैंगिक छळाला कंटाळून महिला न्यायाधीशांनीच केलेल्या इच्छामरणाच्या मागणीची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल

लखनऊ: वृत्तसंस्था

जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित लैंगिक छळाला कंटाळून एका महिला न्यायाधीशाने इच्छा मरणाला परवानगी मागितली आहे. यासंबंधीचे पत्र समाज माध्यमातून प्रसिद्ध होताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्याची गंभीर दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. जनतेच्या आशेचे शेवटचे टोक असलेल्या न्याययंत्रणेतच घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

उत्तर प्रदेशात कार्यरत असलेल्या एका महिला न्यायाधीशाने आपल्या एका नियुक्तीच्या कार्यकाळात खुद्द जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रचाराच्या विरोधात आपण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मृत्यूला कवटाळण्याखेरीज आपल्याकडे अन्य पर्याय शिल्लक नाही, असे या न्यायाधीशाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

हे पत्र समाज माध्यमांवरून प्रसिद्ध होताच सरन्यायाधीशांनी त्याची गंभीर दखल घेतली असून अलाहाबाद उच्च न्यायालय प्रशासनाकडून या महिला न्यायाधीशांच्या तक्रारी काय आहेत, त्यावर न्यायालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीने केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय, याबाबत त्वरित सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

स्वतःलाच देऊ शकले नाही न्याय…

मी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या अपेक्षा ठेवून न्यायाधीश पदासाठी परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होऊन न्याय संस्थेत कर्तव्यावर रुजूही झाले. मात्र, मी स्वतःलाच न्याय देऊ शकले नाही, असे या न्यायाधीशांनी आपल्या पत्रात खेदाने नमूद केले आहे. याच्याही पुढे जाऊन न्यायालयात काम करणाऱ्या आपल्या महिला सहकाऱ्यांनी लैंगिक छळ सहन करत जगण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.