पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे लोकनेते व चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी ऋ कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले आहे.
नितीन गडकरी यांनी गुरूवारी रात्री दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन जगताप कुटुंबियांची भेट घेतली. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, लहान बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची विचारपूस करत सांत्वन केले.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला सर्वोच्च उंचीवर नेण्यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या जाण्याने या शहराची, कार्यकर्त्यांची आणि भाजपची मोठी हानी झाली आहे. त्यांनी या शहराचा केलेला विकास, त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा पुढील अनेक पिढ्यांच्या आठवणीत राहील. आमच्या सगळ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध होते. त्यांचे जाणे हाच आम्हा सर्वांना मोठा धक्का आहे. जगताप परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आत्म्याला परमात्मा शांती देवो व कुटुंबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे, अशीच प्रार्थना करतो.”