मुंबई: वृत्तसंस्था
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मधील टीम इंडियाचा कर्णधार हिटमन रोहित शर्मा याने टी २० क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून रोहितने स्वतःहून हा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
मागील वर्षभरात रोहितने एकही टी २० सामना खेळलेला नाही. विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रोहितने सांगितले होते. प्रत्यक्षात, क्रिकेटच्या छोट्या प्रारूपापासून दूर राहण्याचा निर्णय त्याने यापूर्वीच घेतला आहे. या संदर्भात त्याने आगरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने भारतीय टी २० संघाचे नेतृत्व केले आहे.
पारंपारिक कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट यामध्ये रोहितचे प्रभुत्व आहे. टी २० या प्रकारातही त्याने कर्तृत्व सिद्ध केले असले तरीही क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने रोहितने टी २० या प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.