पुणे : प्रतिनिधी
जगातील सर्वश्रेष्ठ वाचक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलग एक तास पुस्तक वाचन करत अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याला बसून शेकडो आंबेडकरी चळवळीतील वाचनप्रेमींनी पुस्तक वाचन केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक वंदना घेण्यात आली.
यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ‘रिपाइं’ नेते परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, युवानेते निलेश आल्हाट, श्याम सदाफुले, महादेव दंदि, संतोष खरात, चिंतामन जगताप, भारत भोसले, सुशिल सर्वगोड, जितेश दामोदरे, सज्जन कवडे, वसंत ओव्हाळ, बाळासाहेब जगताप, राजेश गाढे, इम्तियाज मेमन, शशिकांत मोरे, चांदणी गायकवाड, प्रमोद कदम, ईशान जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पुस्तक वाचनाचा प्रेरणास्रोत आहे. त्यांचे अफाट वाचन आणि त्यांचा पुस्तक संग्रह हीच त्यांची खरी संपत्ती होती. लोक राहण्यासाठी बंगले बांधतात. डॉ. आंबेडकरांनी मात्र पुस्तकांसाठी बंगले बांधले. समग्र वाचनातून, त्यांच्या व्यापक विश्लेषणातून महान अशी भारतीय राज्यघटना तयार झाली. पुस्तक वाचनातून त्यांना अभिवादन करण्याचा हा क्षण आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब जानराव व डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यावेळी व्यक्त केली.