
मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधाने करून नंतर माफी मागणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी इतिहासाबाबत बोलणे थांबवावे, असा मित्रत्वाचा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांना दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ही दोन्ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची श्रद्धास्थाने आहेत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणे आणि नंतर माफी मागणे हे योग्य नाही. राहुल सोलापूरकर यांना त्यांनी केलेल्या विधानाबाबत कोणत्याही पुस्तकात संदर्भ सापडला असेल तर त्याबद्दलची माहिती त्यांनी जाहीर करावी. त्या संदर्भाची सत्यता तपासून ते अयोग्य असल्यास, तो उल्लेख करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर देखील कारवाई व्हायला हवी, असेही सामंत म्हणाले
सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानाबाबत कोणती कारवाई करायची याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे स्वतः करणार आहेत. सोलापूरकर यांना समज द्यायची की कायदेशीर कारवाई करायची, याचा निर्णय ते घेतील. मात्र, सोलापूरकर हे माझे अनेक वर्षापासून मित्र आहेत. त्यांनी इतिहासावर बोलू नये, असा त्यांना माझा सल्ला आहे, असे सामंत यांनी नमूद केले.