नागपूर: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांच्यासारखे विरोधक लाभले, हे भाजपचे भाग्य आहे. राहुल गांधी हे ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान आहे, अशा उपरोधिक शैलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस यांची खिल्ली उडवली. राहुल गांधी यांना नेता केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे आभारही मानले.
काँग्रेसचे नेतेच त्यांच्या पक्षाची कबर खोदत आहेत. राहुल गांधी यांच्यासारखे नेते विरोधकांचे नेतृत्व करीत असताना आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही, असेही फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना म्हणाले.
काँग्रेसमध्ये नेते मोठे होतात मात्र कार्यकर्ते शिल्लक राहत नाहीत. काँग्रेसचे नेते केवळ स्वतःपुरता विचार करीत असल्यामुळे त्यापेक्षा संघटनेचे महत्त्व संपुष्टात आले आहे. अर्थातच देशातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या पक्षाची अत्यंत दुरवस्था झाली असून तो पुन्हा उभा राहण्याची शक्यता नगण्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.
कार्यकर्त्यापेक्षा मोठा कोणी नाही
भाजपामध्ये कोणताही नेता कितीही ज्येष्ठ असला तरीही कार्यकर्त्यांपेक्षा मोठा कोणीही नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलल्या जातात. नेतृत्वात बदल केला जातो. त्यामुळे नेत्यांची नवी पिढी उभी राहते. ज्या नेत्यांना एका जबाबदारीतून मुक्त केले जाते त्यांना नवीन जबाबदारी दिली जाते. अगदी सर्वोच्च पदावरून पायउतार होणारा नेता हसतमुखाने नवी जबाबदारी स्वीकारतो, अशा शब्दात फडणवीस यांनी भाजपची कार्यपद्धती कथन केली.
पक्षात मतभेद असले तरीही…
भाजपामध्येही मतभेद जरूर आहेत. मात्र, त्यामुळे मतभेद असलेल्यांच्या मधून विस्तव जात नाही अशी परिस्थिती पक्षात निर्माण होत नाही. ज्या ठिकाणी एकाच उमेदवारीचे दोन दावेदार असतात त्या ठिकाणी मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक आपल्याला स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाची सूत्र द्यायची आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नेटाने कामाला लागावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.