
संदीप देशपांडे यांनी केले महायुतीत सहभागी होण्याचे सूचन?
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याविषयी चर्चांना जोर चढत असतानाच नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी, मनसेना प्रमुख राज ठाकरे लवकरच हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असे प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना केले. हिंदुत्वाचे हित साधण्याच्या निमित्ताने राज ठाकरे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर महायुतीत सहभागी होणार असल्याचे सूतोवाच देशपांडे यांनी केले आहे काय, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
राज ठाकरे हे लोकनेते असून त्यांनी महायुतीत सहभागी व्हावे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी राजकीय चर्चा करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी झाल्यास राज्यातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकणे कठीण नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. यावर देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इमारतींचा वारसा इतर कोणाकडेही असला तरी बाळासाहेबांचा वैचारिक वारसा राज ठाकरे यांच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, मराठी माणूस आणि इतर वैचारिक मुद्दे राज ठाकरे यांनी नेहमीच अनुसरण केले आहेत. आगामी २०२४ या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. राजकारणात पुढे काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. सन २०२४ च्या पोटात काय घडले आहे हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि हिंदुत्व आणि मराठी माणसाचे हित साधण्यासाठी राज ठाकरे लवकरच योग्य निर्णय घेतील, असे देशपांडे यांनी सांगितले.