Home Politics राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: प्रतिनिधी

अखंड शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. शिंदे यांनी ठाकरे गटापासून फारकत घेतल्यापासून तब्बल पाच वेळा राज आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. त्यांची सहावी बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत नेमके काय ठरले याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि त्यांचे जवळचे सहकारी बाळा नांदगावकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीचे नेमके कारण दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मूळ शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे संबंध आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला आहे तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर आपला दावा सांगून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे झेंडे उभारले आहेत. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आत्तापर्यंत पाच वेळा राज आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून आज सुरू असलेली भेट ही सहावी भेट आहे. या भेटीत नेमके कोणते राजकीय गणित मांडले जात आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.