केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राज्य सरकारवर टीका
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार असून इतर मागासवर्गीयांच्या हक्कांवर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय आपल्याला मान्य नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांचा विराट मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचताच राज्य सरकारने आंदोलकांच्या कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबांना इतर मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासाठी शनिवारी पहाटे अधिसूचना जारी केल्या आहेतमात्र, राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतील प्रमुख घटक भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या निर्णयाची असहमती व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे इतर मागास वर्गामध्ये अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांना आपला विरोध असून आपण आपली सविस्तर भूमिका सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असा संदेश त्यांनी एक्स द्वारे दिला आहे.
नारायण राणे हे स्वतः मराठा आरक्षणाचे समर्थक असून याआधी राज्य सरकारमध्ये मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. संपूर्ण मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे, अशी त्यांची भूमिका आहे.