हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचा पुनरुच्चार
वाशी प्रतिनिधी
देशातील बहुतेक राज्यात स्थानिक भाषेचा मान राखला जातो तसाच मान महाराष्ट्रात राखला जावा आणि राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकण्याची शक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून इतर राज्यभाषा प्रमाणे तीही एक राज्यभाषा आहे, याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.
आंध्र प्रदेश तामिळनाडू किंवा पश्चिम बंगाल सारख्या राज्यात गेल्यास तिथले लोक हिंदीत नव्हे तर मातृभाषेत बोलतात. महाराष्ट्रात मात्र मराठीच्या ऐवजी सर्रास हिंदी ऐकू येते तेव्हा त्रास होतो, असे ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना नमूद केले.
अनेक भाषा शिकणे हे चांगलेच आहे. परंतु प्रामुख्याने आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातील स्थानिक भाषा शिकणे आणि तिचा वापर करणे आवश्यक आहे. हिंदी भाषेला आपला विरोध नाही. हिंदी ही उत्तम भाषा आहे. मात्र, राष्ट्रभाषा नाही. आपण यापूर्वीच हे विधान केल्यानंतर आपल्यावर खूप टीका करण्यात आली. मात्र, त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचा याबाबतचा दाखला दिल्यानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली, असेही ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातून मराठी संपवण्याचा राजकीय डाव
मराठी ही अतिशय समृद्ध भाषा आहे. तरीही तिची केवळ उपेक्षाच नव्हे तर तिला खुद्द महाराष्ट्रातून संपविण्याचा डाव राजकीय पातळीवर खेळला जात आहे. या गोष्टीला आपला ठाम विरोध आहे. तुम्ही इतर कोणत्याही भाषा शिका पण आपली मातृभाषा आणि आपण ज्या भागात राहतो तिथली स्थानिक भाषा शिकलीच पाहिजे. त्यात कोणताही कमीपणा मानण्याचे कारण नाही, असे ठाकरे यांनी बजावले.
ही पंतप्रधानांवर टीका नाही तर…
नरेंद्र मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान असले तरीही त्यांचे त्यांच्या राज्यावर प्रेम आहे. ते त्यांनी कधीही लपविले नाही. त्यामुळेच जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला. हिऱ्यांचा व्यापार गुजरात मध्ये गेला. गिफ्ट सिटी गुजरात मध्ये उभी राहत आहे. ही पंतप्रधानांवर केलेली टीका नाही. उलट पंतप्रधान मोदी आपल्या राज्यावर जसे प्रेम करतात तसेच प्रेम आपणही करा प्रथम आपल्या राज्याचा विचार करा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.