पुणे: प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्यानिमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या १५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.
माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी याबाबत माहिती दिली आहे.१२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ८ या दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून, यावेळी राम मंदिर निर्माण आंदोलनाच्या अग्रणी नायिका साध्वी ऋतंभरा, स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेएनयुच्या कुलपति शांतिश्री धूलिपुडी पंडित, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, पद्मश्री मिलिंद कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांच्या माध्यमातून सामाजिक पातळीवर विविध क्षेत्रात काम केले जात असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.