अकलूज: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन जात असून रशियाचे पुतीन आणि भारताचे मोदी हे दोघेही सारखेच असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत आहेत. या कार्यक्रमासाठी येथे आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, मोदी यांनी विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून देऊ नका, असे आवाहन आपल्या भाषणात केले आहे. वास्तविक लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये सत्ताधारी पक्ष जितका आवश्यक आहे तितकाच विरोधी पक्ष ही आवश्यक आहे. मात्र मोदी यांना देशातील लोकशाही नष्ट करून हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे पुतीन आणि मोदी यांच्यात काहीही फरक नाही.
केवळ आश्वासने देणे आणि कृती न करणे ही भाजपची रीतच आहे. त्यामुळे त्यांच्या जाहीरनाम्याबद्दल काही बोलणे अयोग्य आहे, अशा शब्दात पवार यांनी भाजपच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. त्यांच्या मागच्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने अद्याप अपूर्ण आहेत. त्याबद्दल कालांतराने सविस्तर बोलू, असेही ते म्हणाले.
आपण काय केले हे न सांगता केवळ गांधी नेहरूंना नावे ठेवणे, ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा छळ करणे हेच मोदी यांना जमते, असा आरोपही त्यांनी केला.