दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे
नवी दिल्ली निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्ध्यांवर कोणत्याही स्तरावर उतरून धूळफेक करण्याची पंरपरा भारताच्याच नव्हे तर जगभरच्या राजकारणाला नवीन नाही. उत्तरप्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना त्याची प्रचिती सर्वपक्षीय नेते आणून देत आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांनी केवळ विरोधकांनाच नव्हे तर प्रसंगी स्वपक्षीयांनाही अडचणीत आणणारे काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी त्या सर्वांवर कडी केली आहे.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुरसटलेल्या विचारांचे आहेत आणि त्यांना मनुस्मृतीच्या आधारावर देशाचा कारभार चालवायचा आहे, असा आरोप दिग्गीराजा यांनी केला. त्याच वेळी ते म्हणाले की रास्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लग्न झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ‘गृहस्थ’ नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्याचा अनुभव नाही. अर्थातच, या तिघांनाही सर्वसामान्य जनतेच्या वेदना समजून घेणे शक्य नाही.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सामाजिक समरसतेचे तत्व खऱ्या अर्थाने समजलेच नाही. त्यामुळे ते ८० आणि २० टक्क्यांची दरी वाढविणारी भाषा बोलत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. राज्यात आणि देशात भाजपच्या सत्तेवर असताना बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका करतानाच त्यांनी बेरोजगारीवर एक पुस्तिकाही प्रसिद्ध केली आहे.