- मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर गजाआड जाण्याची टांगती तलवार असल्याने आपली अटक टाळण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती दाखवून शिवसेना फोडली आणि कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार पाडले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी बेकायदेशीरपणे विरोधी नेत्यांचे भ्रमणध्वनी टॅप केले. त्याबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गुन्हे दाखल झाले होते. फडणवीस यांना अटक होणार होती. अटकेला घाबरून देवेंद्र फडणवीस यांनी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून शिवसेना फोडली. महाविकास आघाडी सरकार पाडले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, असे राऊत यांनी सांगितले.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील सर्व गुन्हे रद्द केले. फडणवीस यांची अटक टळली. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तापालट होणार. इंडिया आघाडी सत्तेवर येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू होणार हे निश्चित आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.