मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भ्रष्टाचारविरोधी बोब ही पोकळ बांग आहे. सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना मांडीवर घेऊन ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा आव आणत आहेत, अशी परखड टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाने आमचे जे लोक घेतले आहेत त्यापैकी १२ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. उठसूट भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे.
अजित पवार धमकीबहाद्दर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धमकीबहाद्दर म्हणून ख्याती आहे. ते रोज सकाळी उठून दहा जणांना तरी धमक्या देतात. त्यांच्या तोंडी वैचारिक विधाने शोभून दिसत नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी अजित पवार यांनाही लक्ष्य केले आहे. ते २०१९ च्या ज्या शपथविधीची गोष्ट सांगतात, ते किती काळ चालणार? ती बाब आता मिळमिळीत झाली आहे, असेही ते म्हणाले.
कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय हे थोतांड
कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी उठवणे हे एक थोतांड आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नव्हे तर गुजरातच्या दलालांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे, ते अफगाणिस्तानसारखे छोटे देश आहेत. तिथे कांदा आपल्यापेक्षा स्वस्तात मिळतो. त्यामुळे निर्यातबंदी उठवल्याने शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असा आरोपही राऊत यांनी केला.