
अमरावती : प्रतिनिधी
या लोकसभा निवडणुकीत केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर त्यांचे सहयोगी पक्षही नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मते मागत आहेत. मात्र, मोदी लाट आहे या भ्रमात राहू नका, असे विधान खुद्द भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी करून विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांना भाजपाने आपले महायुतीतील सहकारी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यासह स्थानिक स्वपक्षीय नेत्यांचा विरोध असतानाही पक्षात सामावून घेतले आणि लोकसभा निवडणुकीचे तिकीटही दिले. मात्र, राणा यांनी मोदी लाटेबद्दलच शंका व्यक्त करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नावाची लाट आहे या भ्रमात राहू नका. मागच्या निवडणुकीत मोदी यांचा मोठा बोलवाला असतानाही याच मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती, हे लक्षात घ्या. ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे सतर्क राहून लढवायची आहे, असे त्या एका जाहीर सभेत बोलताना म्हणाल्या.
भाजपने राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडून या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. त्याचप्रमाणे भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्येही राणा यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी आहे. त्यात खुद्द मोदी यांच्या प्रभावाबद्दल शंका व्यक्त केल्याने राणा यांच्याबरोबर काम करीत असलेले भाजप कार्यकर्तेही बिथरले आहेत. राणा यांच्या या विधानाचा राजकीय फायदा विरोधकांकडून निश्चितपणे उठविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून राणा यांना जपून बोलण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.