ठाणे: प्रतिनिधी
‘हिंदायान’ हे निश्चितच आपल्या भारतीय वारसाचे, संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनेल, असे अभिमानास्पद गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे सोमवार, दि.13 नोव्हेंबर 2023 रोजी”हिंदायान” सायकल स्पर्धा आणि मोहीम 2024 च्या दुसऱ्या पर्वाच्या नोंदणी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हिंदायानमध्ये सामील होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करताना मुख्यमंत्री म्हणाले, सायकल चालविणे आपल्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठीही निश्चित उपयुक्त आहे. सध्याच्या परिस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी शक्य तिथे सायकलचा वापर करणे, ही काळाची गरज बनली आहे.
“हिंदायान” च्या दुसऱ्या पर्वात विविध मोहिमा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पर्वात ही स्पर्धा व मोहीम सर्वांसाठी खुली आहे. ही मोहीम दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथून सुरू होईल आणि आग्रा, जयपूर, गांधीनगर, ठाणे आणि मुंबई मार्गे पुण्यात पोहोचल्यानंतर याची सांगता होईल .
याशिवाय, महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात दि.1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत प्रत्येकी 110 किमीच्या तीन टप्प्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
“हिंदायान” चे संयोजक आणि जग परिक्रमा करणारे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय श्री.विष्णुदास चापके याप्रसंगी म्हणाले, आम्ही “हिंदायान” मोहीम सुरू करण्यामागे तीन उद्दिष्टे आहेत, पहिले उद्दिष्ट ऑलिम्पिकमध्ये 22 सायकलिंग इव्हेंट आहेत, ज्यात 66 पदके आहेत. तथापि, गेल्या 60 वर्षात एकही भारतीय सायकलपटू भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरलेला नाही. 1964 ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा होती, ज्यामध्ये चार सायकलपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या निमित्ताने भारतीय सायकलपटूस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकेल. दुसरे उद्दिष्ट आहे ते सशस्त्र दल आणि राज्य पोलिसांचे साहसी सायकलपटू सायकल शर्यतींमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जातात, कारण त्यांना अशा स्पर्धांसाठी भारतात कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही. या निमित्ताने त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल.
आणि तिसरे उद्दिष्ट भारतात सायकलिंग संस्कृती विकसित करण्याची आणि त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नितांत गरज आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास आणि शाश्वत विकासासाठी मदत होईल.
“हिंदायान” सायकल स्पर्धेचे पहिले पर्व दि. 5 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत नवी दिल्ली ते पुणे यादरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाले होते.
यावर्षी वर्ष 2024 ची ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी म्हणजेच दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी सिंहगड, पुणे येथे या स्पर्धेची सांगता होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सायकलपटू विष्णुदास चापके पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी या मोहिमेत फक्त भारतीय भूदल आणि नौदलाचे संघ सहभागी झाले होते. मात्र यावर्षी या स्पर्धेत गृह मंत्रालय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने सामील होण्यास प्रतिसाद दिला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही (NDRF) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांचा होकार कळविला आहे. याशिवाय “हिंदायान” सर्वांसाठी खुले आहे. राईडची नोंदणी अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक सायकलपटूंनी नोंदणी करण्यासाठी www.hindayan.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.