मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दहीहंडी उत्सव आणि गोविंदांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आलाय. तसेच गोविंदांना राज्य सरकारच्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये मिळणार आहे. दहीहंडीला शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना 7 लाख 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
इतर खेळाप्रमाणे राज्यात पुढील वर्षी प्रो गोविंदा स्पर्धा होणार आहे. दहीहंडी उत्सवात गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे