हैदराबाद: वृत्तसंस्था
दीर्घकाळ कष्ट करून तेलंगणाचे मुख्यमंत्री पद मिळविल्यानंतर लगेचच रेवंत रेड्डी यांनी तातडीने निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेल्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. त्यांनी शपथ ग्रहण करताच मुख्यमंत्री निवासस्थानाची द्वारे जनसामान्यांसाठी खुली केली आहेत.
रेड्डी यांनी तेलंगणातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी सत्ता नसतानाही मागील अडीच ते तीन वर्षाच्या काळात मोठे कष्ट घेतले. त्याचे फळ म्हणून मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी, माझी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली.
शपथ ग्रहण समारोह संपतानाच रेडी यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. आपली सत्ता आल्यास मुख्यमंत्री निवासस्थानाची द्वारे सर्वसामान्य जनतेसाठी सदैव खुली असतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. सत्ता ग्रहण केल्यावर त्वरित त्यांनी बुलडोजर आणि अन्य यंत्रसामग्री कामाला लावून ज्योतिराव फुले भवन या मुख्यमंत्री निवासस्थानासमोरील लोखंडी अडथळे दूर केले. तसेच संरक्षक भिंतही काढण्याचे काम सुरू आहे.