
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर ठोकलेल्या आमदार अपात्रतेच्या दाव्यांचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केवळ शिंदे गटाच्या नव्हे तर महायुती सरकारच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर केली आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निकालाबाबत पूर्ण समाधानी नाहीत. एवढेच नव्हे तर हा निकाल देताना अध्यक्षांवर कोणता दबाव होता, असा सवालही त्यांनी केला आहे.
आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देताना शिवसेना पक्ष अध्यक्षांनी शिंदे गटाच्या पारड्यात टाकला. याशिवाय शिंदे गटाच्या एकाही आमदाराला अपात्र ठरविता येणार नाही, असा निकाल देऊन मोठा दिलासाही दिला. मात्र, ठाकरे गटाचे आमदार अपात्र का ठरले नाहीत, असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत आपली नाराजी व्यक्त केली. हा निर्णय घेताना अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता, असा सवालही त्यांनी केला.
दुसरीकडे अर्थातच, ठाकरे गट अध्यक्षांच्या निर्णयावर पूर्णपणे नाराज आहे. वरून लादलेला निर्णय, लोकशाहीची पायमल्ली, निर्लज्जपणाचा कळस अशा शेलक्या शब्दांनी ठाकरे गटाकडून या निकालावर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गट या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून तिथे हा निर्णय टिकणार नाही. आम्हाला योग्य न्याय मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा अध्यक्षांचा हा निकाल अपेक्षितच होता. मात्र, हा निकाल ही आमच्यासाठी एक संधी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेलच. मात्र, हा निर्णय राज्यातील जनतेला मान्य नाही. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनता मतदानाद्वारे योग्य न्याय करेल, असे पवार म्हणाले.