- मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे हेच कायम राहणार असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. आगामी निवडणुका महायुती एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखालील असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यांना मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन देऊन सरकार मध्ये सहभागी करून घेतले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, राज्यातील सत्तानाट्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीच या वावड्यांचा फुगा फोडला आहे.
अजित पवार यांना सत्तेत आणि महायुतीत सामावून घेत असतानाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहतील, याची स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलाचा कोणताही विचार अथवा हालचाली राज्याच्या अथवा केंद्राच्या पातळीवर सुरू नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील आजच बालेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना सध्या तरी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न उद्भवत नाही असे स्पष्ट केले आहे. त्यांनी देखील सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे नमूद केले. त्यांच्या वक्तव्याने फडणवीस यांनी व्यक्त केलेली भारतीय जनता पक्षाची भूमिका अधोरेखित झाली आहे.