
मुंबई: मुंबईत रिलायन्स जिओची सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबईच्या अनेक भागातील वापरकर्ते आपल्या मोबाईलवरून कॉल करू शकत नाहीत किंवा इंटरनेटही वापरू शकत नाहीत. गेल्या चार महिन्यांत जिओ सेवा मुंबईत ठप्प होण्याची ही दुसरी वेळ आहे. दि. ५ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ नंतर सेवा पूर्ववत सुरू होतील, असे स्पष्टीकरण रिलायन्स जिओच्या वतीने देण्यात आले आहे.
जिओ वापरकर्त्यांनी ट्विटरवर आपल्या तक्रारींचा वर्षाव केला आहे. कोणत्याही नंबरवर कॉल आल्यावर कॉल रिसिव्ह होत नसल्याचा वापरकर्त्यांचा दावा आहे. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जिओ वरून जिओ नंबरवर आणि जिओ वरून इतर नंबरवर कॉल करण्यात समस्या येत आहे.
याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही जिओचे नेटवर्क डाउन झाले होते, त्यानंतर ग्राहक तब्बल ८ तास सेवांपासून वंचित राहिले. त्या काळातही ग्राहकांना इंटरनेट आणि कॉलिंग या दोन्ही सेवांमध्ये अडचणी येत होत्या. त्याआधी २२ जून २०२० रोजी, लखनौ, लुधियाना, डेहराडून आणि दिल्लीमध्ये जिओ फायबर सेवा जवळपास २४ तासांसाठी बंद करण्यात आली होती.