Home Politics ‘मी मुख्यमंत्री आहे; दहशतवादी नाही’

‘मी मुख्यमंत्री आहे; दहशतवादी नाही’

‘मी मुख्यमंत्री आहे; दहशतवादी नाही’

हवाई प्रवास नाकारल्याने चन्नी संतप्त

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे विमानप्रवासाची परवानगी नाकारण्यात आल्याने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रॅलीत सहभागी होता आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चन्नी यांनी, मी मुख्यमंत्री आहे; दहशतवादी नाही; असे संतप्त उद्गार काढले. तुम्ही मला होशियारपूरला जाण्यापासून रोखता; हा योग्य हा मार्ग नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या जालंधर भेटीमुळे ‘नो-फ्लाय झोन’ लागू करण्यात आला असल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणासाठी एक तासाहून अधिक वेळ वाट बघावी लागली. त्यामुळे ते राहुल गांधींच्या रॅलीसाठी चंदीगडहून होशियारपूरला जाऊ शकले नाहीत. त्यांना हेलिपॅडवरून माघारी फिरावे लागले.

“मी सकाळी ११ वाजता उनामध्ये होतो पण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे माझ्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री चन्नी होशियारपूरला जाऊ शकले नसले तरी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला शहरात उतरण्याची परवानगी देण्यात आली. हा विषय आता राजकीय वादाचा ठरत आहे. मोदी सरकारने चरणजितसिंग चन्नी यांना होशियारपूरला येण्याची दिलेली परवानगी रद्द केली. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते सुनील जाखड़ म्हणाले.