अहमदाबाद: काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल किंवा प्रियांका गांधी यांच्याबद्दल आपली काही तक्रार नाही. त्यांच्यावर मी नाराज नाही. माझी नाराजी गुजरातमधल्या राज्यस्तरीय नेत्यांवर आहे. त्यांना इथे कोणाला कामंच करू द्यायचे नाही, विरोधी पक्ष म्हणून गुजरातच्या नागरिकांचा आवाज आम्ही उठवू शकत नाही, अशी खंत पक्षाचे गुजरात कार्याध्यक्ष हार्दीक पटेल यांनी व्यक्त केली.
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हार्दीक पटेल पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, पटेल यांनी अद्याप आपली मूठ झाकलेलीच ठेवली आहे. एकीकडे स्थानिक नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करतानाच, आपण इतर कोणत्या पक्षात दाखल होऊ, अशा अटकळी कोणी बंधू नयेत, असेही ते म्हणाले.
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक आहे. कारण त्यांची निर्णयक्षमता वेगवान आहे. काँग्रेसची अडचण ही आहे की, काँग्रेसमध्ये निर्णय घेणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ भाजपाशीच नवहे तर प्रत्यक्ष मतदारांशीही लढावे लागेल. गुजरातची जनता विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसला स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी आवाज उठवण्यासही मर्यादा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या निर्णयाबाबत प्रश्नाला उत्तर देताना पटेल म्हणाले की, अयोध्या प्रश्नाबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला. आम्हालाही आनंदच झाला. आम्हीही सांस्कृतिकदृष्ट्या रामाशी जोडलेले आहोत, असेही पटेल म्हणाले.