Home Pimpri-Chinchwad मिळकतकर वसुलीसाठी सोसायटीधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवा : आमदार महेश लांडगे

मिळकतकर वसुलीसाठी सोसायटीधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवा : आमदार महेश लांडगे

0
मिळकतकर वसुलीसाठी सोसायटीधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवा : आमदार महेश लांडगे

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना सूचना
पिंपरी । प्रतिनिधी
मिळकतकर वसुलीसाठी सोसायटीधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मिळककर वसुलीसाठी शहरातील सदनिकाधारकांचा पाणी पुरवठा (कनेक्शन) बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. तशी नोटीस संबंधित सोसायटीधारकांना देण्यात आली आहे. मात्र, गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी कायद्यानुसार, प्रशासनाला अशाप्रकारे कारवाई करता येत नाही. मार्च अखेर असल्यामुळे जास्तीत-जास्त वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याकामी प्रशासन सोसायटीधारकांवर अन्यायकारक आणि नियमबाह्यपणे दबाव निर्माण करीत आहे, ही बाब योग्य नाही.
सोसायटींमध्ये वास्तव्य करणाऱ्या मिळकतधारकांनी मिळकतकर भरला नाही, तर संबंधित सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्याची रितसर नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. शहराशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार आता प्रशासनाकडे आहे. मात्र, लोकांसंदर्भात एखादी कारवाई करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे आमचे मत आहे.

स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होईल किंवा प्रशासनाविरोधात जनक्षोभ उफाळून येईल, अशी कृती प्रशासनाकडून अपेक्षीत नाही. मिळकतकर वसूल झालाच पाहिजे. मात्र, शहरातील नागरिकांना नाहक मन:स्ताप होईल, अशाप्रकारे कारवाई करणे उचित नाही. प्रशासनाने याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. अशाप्रकारे सोसायटीधारकांना दिलेल्या नोटीसा रद्द कराव्यात. तसेच, मिळकतकर वसुलीसाठी लोकांना विश्वासात घेवून वसुली धोरण ठरवावे, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.