चिंचवड १५ : मिलिंद देशमुख यांनी डोक्यावर दुधाची बाटली ठेवून तोल संभाळत 104.2 किलोमीटर चालण्याचा विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊन आज तिस वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याचा सत्कार करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. हा रेकॉर्ड करणं निश्चितच कठिण काम आहे मात्र हे रेकॉर्ड्स केव्हातरी मोडले जातात. गेली तीस वर्ष मिलिंद कुटुंब, नोकरी आणि चळवळ या एकाच वेळेस तीन बाटल्या डोक्यावर घेऊन चालतो आहे. या कामाची नोंद कुठेही घेतली जात नाही मात्र हे अधिक आव्हानात्मक आहे, अश्या शब्दांत डाॅ. हमीद दाभोलकर यांनी मिलिंद देशमुख यांचे कौतुक केले. ते देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीत बोलत होते.
बुद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष टेक्सासदादा गायकवाड म्हणाले, डाॅ. नरेंद्र दाभोलकर हे बाबासाहेब आंबेडकर, बुद्धाचा विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य करत होते. या कार्यात आमच्या देहुगावचे मिलिंद देशमुखांसारखे शिलेदार त्यांनी घडवले याचा आम्हाला देहूकर म्हणून सार्थ अभिमान वाटतो. महा. अंनिससाठी धम्मभूमीचे दरवाजे कायमच खुले असतील.
या कार्यक्रमातच महा. अंनिसच्या देहूगाव शाखेची स्थापना करण्यात आली. शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून भारत विठ्ठलदास यांची निवड करण्यात आली. त्यांच्या सत्कार सर्जेराव कचरे यांनी केला.
प्रमुख पाहुणे अरूण थोपटे यांनी संत तुकाराम महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सत्कार समारंभाचे अध्यक्ष सर्जेराव कचरे यांनी व्यसन मुक्तीवर विचार मांडले. अनिल वेल्हाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, अलका जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. सायली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. बुद्ध विहार कृती समितीचे कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य लाभले.
या सत्कार समारंभासोबतच सकाळी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्राचार्य राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीपाल ललवाणी, राजेंद्र कांकरिया, सौरभ बागडे, मिलिंद देशमुख यांनी शिबिरार्थींना वैज्ञानिक दृष्टिकोन, अंनिसची चतुःसुत्री, कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. भारत विठ्ठलदास यांनी चमत्कारांचे सादरीकरण केले. शिबीरास तरुणांची उपस्थिती अधिक होती. या शिबिरात लायन्स क्लब शिक्षण संस्थेचे विषेश सहकार्य लाभले.