सातारा दि.29 : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी करावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022 च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले. निर्भीड पत्रकारितेसाठी ते गरजेचे आहे. पत्रकारितेतील सुरुवातीच्या काळासाठी त्यांना काही विद्यावेतन देता येईल का ? याचाही अभ्यास करु. पत्रकारांना आरोग्य, मुलांना शिक्षण तसेच राहण्यासाठी घरे याबरोबर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.