
सोलापूर: प्रतिनिधी
आपल्याला डावलून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या बंडखोरीला मोहिते पाटील कुटुंबीयांची कितपत साथ मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
या लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे आग्रही होते. मागील निवडणुकीत विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने आपली पूर्ण ताकद त्यांच्या मागे लावली होती. मात्र, कालांतराने नाईट निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबीयांमध्ये विपुष्ट आल्याने हा आग्रह अधिक तीव्र होत गेला.
आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याचे निश्चित केले असून खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूज येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अद्याप उमेदवार जाहीर न झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी ही जाहीर करण्यात येणार आहे.
मुळात मोहिते पाटील कुटुंब दीर्घकाळ शरद पवार यांच्याबरोबर राहिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे एकेकाळी पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. मात्र, कालांतराने त्यांनीच शरद पवार यांची साथ सोडून भाजपची कास धरली. आता मोहिते पाटील पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याचे निश्चित झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत. या मराठीचा परिणाम म्हणून ते देखील अजित पवार गटाचा त्याग करून पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. माढा मतदारसंघातून आपले बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते का, याची चाचपणीही त्यांनी यापूर्वी केली आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांना राजकीय रसद मिळू शकते.