खा. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दामले यांचा मानपत्र देऊन गौरव
पिंपरी पुणे (दि. १२ नोव्हेंबर २०२२) – आपल्या 32 नाटकांचे साडेबारा हजार प्रयोग आता पर्यंत झाले आहेत. नवीन नायिका, सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव याकडे कसं पाहता… काही क्षण थांबून प्रशांत दामले यांचे उत्तर… कपडे घालावे लागतात आणि ते बदलावे ही लागतात म्हणूनच प्रेक्षक मला सहन करत गेले. साडेबारा हजार प्रयोग करणे शक्य झाले… या उत्तराला उपस्थितांची भरभरून दाद… अशी शब्दांची फटकेबाजी करत दामले यांनी आपली प्रकट मुलाखत गाजवली.
निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखा आणि शहरवासीयांच्या वतीने सोमवार (दि. १२ नोव्हेंबर) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते दामले यांचा मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, आमदार उमा खापरे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशचे रविकांत वर्पे, अभिनेत्री ब्रिंदा पारेख, राजेंद्र बंग, किरण भोईर, सुहास जोशी आदी उपस्थित होते.
दामले म्हणाले, मी लहानपणी खोडकर असल्यामुळे मला बाबांनी पिंपरी चिंचवडला शिक्षणासाठी पाठवले. येथील संघवी केसरी महाविद्यालयात माझे शिक्षण सुरू होते. यावेळी मी प्रथमच ‘काका किश्याचा’ या नाटकामध्ये काम केले; आणि इथून पुढे माझी अभिनयाची वाटचाल सुरू झाली. या वाटचालीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. माझा अभिनय म्हणजे दिग्गज कलावंत शरद तळवळकर, राजा गोसावी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची मिसळ आहे. प्रत्येकाकडून काही चांगले घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून कमरेखाली विनोद करायचा नाही याची शिकवण, दक्षता आणि जाण मिळाली. यावेळी दामले यांनी ज्येष्ठ कवी, संगितकार स्व. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सांगा कसं जगायचं’ हे गीत सादर केले. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, प्रशांत दामले हे रंगभूमीचा श्वास आहेत. ज्याप्रमाणे आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, यांचे कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवला त्याप्रमाणे पुढील पिढी दामले यांच्या कलेचा वारसा पुढे चालवतील असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला. राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्र हे दोन्ही वेगळे ठेवले आणि त्यामुळेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणे शक्य झाले, असेही भोईर यांनी स्पष्ट केले.
आ. उमा खापरे म्हणाल्या की, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते. पवारांनी सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. पिंपरी चिंचवड सांस्कृतिक नगरी झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करत होतो त्यावेळी शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबरोबरच प्रा. रामकृष्ण मोरे यांचाही सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोठा वाटा असल्याचे आ. खापरे यांनी नमूद केले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन श्रीकांत चौगुले यांनी, आभार किरण भोईर यांनी मानले. यावेळी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाट्य प्रयोगाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. त्याला रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.