
नवी दिल्ली: प्रतिनिधी
मणिपूर येथील महिलांचे धिंड प्रकरण संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजकारणापेक्षा कायदा सुव्यवस्था आणि महिलांचा सन्मान या बाबी अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न काढून त्याची चित्रफित प्रसिद्ध करण्याच्या प्रकरणा बाबत मोदी यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने ही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून केंद्र आणि राज्य सरकारला त्याबाबत जाब विचारला आहे.
मणिपूर मधील घटनेने संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली आहे. कोणत्याही सभ्य आणि सुसंस्कृत समाजात अशा घटना घडता कामा नये. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि दुष्पवृत्तींना चाप बसावा यासाठी केंद्र सरकार कठोरात कठोर पावले उचलेल, असे मोदी यांनी सांगितले.
या प्रकरणाची दखल घेऊन आपण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहोत. वीरांचा सन्मान आणि कायदा सुव्यवस्था स्थिती याला राजकारणापेक्षा अधिक महत्त्व असून सर्व मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन आपण करू, असेही ते म्हणाले.