प्रकाश आंबेडकर यांची टीका
महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मुस्लिम समाजाची केवळ मते हवी आहेत. मात्र, उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून द्यायची इच्छा नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाविकास आघाडीने अद्याप एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुस्लिम समाजाबाबत हीच भूमिका असेल तर तुमच्यात आणि भारतीय जनता पक्षात काय फरक राहिला, असा सवाल करीत आंबेडकर यांनी, कोणतेही प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देत नाहीत अशी टीका केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेची शिकवण दिली. त्यानुसार आत्तापर्यंत भेदाभेद नष्ट होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही प्रस्थापितांच्या डोक्यातून भेदाभेदांची जळमटे निघालेली नाहीत, हेच यावरून दिसून येत आहे, असेही आंबेडकर यांनी नमूद केले.