Education(Nitin Yelmar) – पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोकळ्या जागेत ‘आयआयएम’ची शाखा सुरू करावी. त्याद्वारे परिसरातील उद्योग व रोजगार क्षेत्राला चालना द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’सारखी व्यवस्थापन शिक्षणाची प्रख्यात संस्था उद्योगनगरीत सुरू झाल्यास खर्या अर्थाने पिंपरी चिंचवड ‘एज्युकेशन हब’ होईल.
नुकतेच मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग म्हणजेच नीटी या संस्थेलाच आता आयआयएम म्हणून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील आयआयएममध्ये एमबीएच्या जवळपास साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच आता देशातील 21 आणि महाराष्ट्रातील नागपूर नंतर दुसरी आयआयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे पाहिलं जाणार आहे. त्यामुळे पिंपरी आयआयएम संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेणार, हे पहावे लागेल?
सध्यस्थितीला आयआयएम संस्थेकडून शाखा विस्तारासाठी पिंपरी चिंचवड मध्ये जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी हवेली तहसिल प्रशासन आणि पुणे विभागीय प्रशासनाकडून शासकीय जागा व गायरान जमिनीच्या उपलब्धतेची चाचपणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्टा, मुंबई आणि पुणे शहराशी असलेली ‘कनेक्टिव्हीटी’ याचा विचार करुन शहरात आयआयएम शाखा सुरू करणे सोईचे होणार आहे.
‘एज्युकेशन हब’ चा अजेंडा…
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या साथीने आम्ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘एज्युकेशन हब’ व्हावी. याकरिता प्रयत्न करणार आहोत, असा अजेंडा महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवडकरांसमोर ठेवला होता. त्या अनुसरुन, आपण प्राधिकरण आणि महापालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय कला अकादमी सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. या पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या हिताच्या दृष्टीने भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा शहरात व्हावी व्हावी, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
आयआयएम संस्था इतिहास
अनेक प्रतिभावंत आयआयटी, आयआयएम या दोन संस्थांतून घडले आहेत. या दोन संस्थांची स्थापना साठच्या दशकातील. आज ६०-७० वर्षांनंतरही या दोन्ही संस्थांचा बहर कायम आहे. त्यानंतर आपल्याकडे अशी काही शैक्षणिक संस्थात्मक उभारणी झाली नाही. या आयआयटी, आयआयएम, स्वामी विवेकानंदांशी जपान-अमेरिका प्रवासात बोटीवर जमशेटजी टाटा यांच्या झालेल्या गप्पांतून आकारास आलेली बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात अडकून पडलेल्या आणि इंग्लंडला परत जाऊ न शकणाऱ्या आपल्या नातेवाईकाच्या साहाय्याने जेआरडी टाटा यांनी जन्मास घातलेली मुंबईची टाटा मूलभूत विज्ञान संस्था असे काही आदरणीय अपवाद सोडले तर आपले शैक्षणिक विश्व हे बौद्धिक दारिद्रय़ाची खाण ठरते. अन्य संस्थांत त्यातल्या त्यात उल्लेख करावा अशी बिर्ला समूहाची बिट्स पिलानी. पण तिची स्थापनाही आयआयटीच्याच आगेमागे, म्हणजे साठच्या दशकात झालेली. अनेक आरेखनकारांना घडवणाऱ्या अहमदाबाद येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’ या संस्थेचेही तसेच. तिचे जन्मवर्ष १९६१. म्हणजे पुन्हा तोच काळ. या संस्था वगळता मुंबईचे सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, व्हीजेटीआय, पुण्याचे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एके काळचे अन्य काही अपवाद. पण सद्य:स्थितीत या सगळय़ांचीच रया गेलेली. हे सर्व काय दर्शवते? आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक संस्था साठच्या दशकात जन्मलेल्या आहेत आणि त्याच संस्थांतील विद्यार्थ्यांनी मानवी प्रतिभेची नवनवी शिखरे पादाक्रांत केलेली आहेत.
आयआयएममध्ये शिकण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी मग मुंबईतील विद्यार्थी राज्याबाहेरील आयआयएमच्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. केंद्र सरकारने पिंपरी आयआयएम ल मंजूरी दिल्यास उद्योगनागरीतील विद्यार्थ्यांना आयआयएम मधून शिकण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
देशांतील आयआयएम संस्थेची ठिकाणं
- आयआयएम कलकत्ता, पश्चिम बंगाल
- आयआयएम अहमदाबाद, गुजरात
- आयआयएम बंगलोर, कर्नाटक
- आयआयएम लखनौ, उत्तर प्रदेश
- आयआयएम कोझिकोड, केरळ
- आयआयएम इंदूर, मध्य प्रदेश
- आयआयएम शिलाँग, मेघालय
- आयआयएम रायपूर, छत्तीसगड
- आयआयएम रायपूर, झारखंड
- आयआयएम रोहतक, हरियाणा
- आयआयएम काशीपूर, उत्तराखंड
- आयआयएम तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
- आयआयएम उदयपूर, राजस्थान
- आयआयएम अमृतसर, पंजाब
- आयआयएम बोध गया, बिहार
- आयआयएम नागपूर, महाराष्ट्र
- आयआयएम संबलपूर, ओडिशा
- आयआयएम सिरमौर, हिमाचल प्रदेश
- आयआयएम विशाखापट्टणम,आंध्र प्रदेश
- आयआयएम जम्मू, जम्मू आणि काश्मीर
- आयआयएम मुंबई, महाराष्ट्र
प्रतिक्रिया – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
औद्योगिक शहरात आयआयएम सारखी संस्था सुरू झाल्यास रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच, पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात भर पडेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल आणि पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयएम संस्था प्रशासनाशी चर्चा करुन पिंपरी-चिंचवडमध्ये शाखा विस्तारासाठी सहकार्य कारावे, अशी मागणी केली आहे. त्याला निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.