नवी दिल्ली: दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या बीआर चोप्रा निर्मित ‘महाभारत’ मालिकेमध्ये भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्रीडा, अभिनयासह राजकारणातही सहभागी असलेल्या प्रवीण कुमार यांना अखेरच्या काळात आजार आणि आर्थिक विपन्नावस्थेला तोंड द्यावे लागले. काही काळापूर्वी प्रवीण कुमार यांनी उदरनिर्वाहासाठी कलाकार अथवा खेळाडू म्हणून निवृत्तीवेतन मिळावे यासाठी सरकारला विनंती केली होती.
क्रीडाक्षेत्रातील कारकीर्द
प्रवीण कुमार सोबती त्यांची उंची आणि बलदंड शरीरयष्टी यामुळे खूप प्रसिद्ध होते. त्यांनी हातोडाफेक आणि थाळीफेक या क्रीडाप्रकारात नैपुण्य प्राप्त केले होते. आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण कुमार यांनी ऍथलेटिक्समध्ये अनेक पदके जिंकली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे निवृत्त ‘डेप्युटी कमांडंट असलेल्या’ प्रवीण कुमार यांनी हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सन १९६०-७० च्या दशकात त्यांनी क्रीडाक्षेत्रातही प्रचंड लोकप्रियता मिळवली.
अभिनयातील कारकीर्द
आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे लोकप्रियता मिळविलेल्या प्रवीण कुमार यांना महाभारतातील भीमाच्या भूमिकेसंदर्भात भेटण्याची इच्छा खुद्द बी आर चोप्रा यांनी व्यक्त केली. तो पर्यंत अभिनय क्षेत्राचा गंधही नसलेल्या परावी कुमार यांनी बी आर चोप्रा यांची भेट घेतली. प्रवीण कुमार यांची उंची आणि देशयष्टी पाहताच चोप्रा त्वरित उद्गारले, ‘भीम सापडला आहे’. महाभारतापासून प्रवीण कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.त्यानंतर त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा ‘महाभारत और बर्बर हा शेवटचा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही त्यांनी भीमाची भूमिका साकारली.
राजकारणात प्रवेश
क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात मिळालेल्या लोकप्रियतेच्या जोरावर प्रवीण कुमार यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आम आदमी पार्टीच्या तिकिटावर दिल्लीतील वजीरपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांअपराभवाला सामोरे जावे लागले. काही काळानंतर त्यांनी आप सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.