पिंपरी, दि. 16 – पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली पवना नदी रविवारी (दि. 16) पुन्हा फेसाळली. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नदी सुधार प्रकल्प हाती घेतले आहेत. तर दुसरीकडे महापालिकेचे ढिम्म प्रशासन नदी सुधार बाबत कुठलीही कार्यवाही करत नसल्याने पवनामाईची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे पवना नदीच्या प्रदुषणासाठी कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “थेरगाव येथील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली. शहरातील ड्रेनेजचे पाणी कुठलीही प्रक्रिया केल्याशिवाय थेट नदीत सोडले जाते. तसेच रसायन मिश्रित पाणी देखील नदीत मिसळले जाते. यामुळे पवना नदीची दुरवस्था झाली आहे. जलपर्णी वाढणे, पाण्यावर फेस येणे; हे प्रकार सातत्याने सुरु आहेत. नदीचे आरोग्य बिघडल्याने त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर देखील होणार आहे.
नदीत थेट ड्रेनेजचे आणि केमिकल मिश्रित पाणी सोडले जाऊ नये याबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. नदी प्रदूषित होण्याच्या कारणांच्या तळाशी जाऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र महापालिका प्रशासन असे करताना दिसत नाही. पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
पवना नदी प्रदूषित झाल्याने नदीतील मासे आणि इतर जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. भर पावसाळ्यात देखील नदी फेसाळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे याबाबत महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई कारवाई, असेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले