पिंपरी, १५ सप्टेंबर २०२३ :- नवजात बालकाच्या आयुष्याला आकार देण्याचे काम ज्याप्रमाणे माता करीत असते तसेच शहराला आकार देण्याचे काम अभियंते करीत असतात आणि कला, कौशल्य आणि निपुण ज्ञानाच्या माध्यमातून शहराला नवनिर्मितीच्या शिखरावर नेत असतात असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आणि सर्व अभियंत्यांना शुभेच्छाही दिल्या.
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, सह शहर अभियंता रामदास तांबे, बाबासाहेब गलबले, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, नितीन समगीर तसेच विविध विभागातील अभियंते उपस्थित होते.
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते, त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान आहे. देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. दरवर्षी १५ सप्टेंबर हा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
शहर अभियंता मकरंद निकम यांनी महापालिकेतील सर्व सहकारी अभियंते यांच्या सहकार्यातून महापालिकेचे प्रकल्प यशस्वी होत असल्याचे सांगितले.
शहराच्या जडणघडणीत आणि सौंदर्यात अभियंत्यांचे अनमोल योगदान आहे. आज सुंदर शहरांना पाहिले की अभियंत्याच्या योगदानाची जाणीव होतेच असे मत उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले.
सह शहर अभियंता रामदास तांबे म्हणाले, अभियंता पदाची जबाबदारी पार पाडत असताना कौशल्याचा, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होतो असे सांगून महापालिकेचे सर्वच अभियंते चांगल्या पध्दतीने काम करत असल्याचेही तांबे यांनी सांगितले. तर उप आयुक्त मनोज लोणकर यांनी स्वतः अभियंता असून त्या पदावर काम केल्याचे सांगितले.
राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशन यांच्या वतीने संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी, प्रास्ताविक पिंपरी चिंचवड ज्युनिअर इंजिनिअरिंग असोसिएशनचे सचिव संतोष कुदळे यांनी केले तर आभार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खोत तसेच सुनील बेळगावकर यांनी मानले.