नवी दिल्ली: प्रतिनिधी
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिल्याने ही बैठकच रद्द करण्यात आली आहे. मात्र, घटक पक्षांच्या संसदीय गटाची अनौपचारिक समन्वय बैठक पार पडण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांची रणनीती निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीबद्दल आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी आघाडीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्या पाठोपाठ नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनीही उपस्थित राहण्यास नकार दिल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधकांची इंडिया आघाडी उभारण्यात आली आहे. दीर्घ काळापासून विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मात्र काँग्रेसशी संबंध ताणले गेल्याने आघाडी पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणार होती.
घटक पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते बैठकीसाठी उपलब्ध नसल्याने बैठक रद्द करण्यात आली आहे. मात्र, अनौपचारिक समन्वय बैठकीत घटक पक्षांचे संसदीय पक्षनेते उपस्थित राहणार आहेत, असे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.