मनोज जरांगे पाटलांची आग्रही मागणी
यवतमाळ: प्रतिनिधी
मराठा म्हणून दिले जाणारे आरक्षण टिकू शकणार नाही. त्यामुळे समाजाला इतर मागासवर्गीय कोट्यातूनच आरक्षण मिळाले पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
आमच्या मागणीचा सर्व स्तरातून सन्मान होत आहे. आगरी, कोळी समाजाचाही आम्हाला विरोध नाही. केवळ मंत्री छगन भुजबळ आणि इतर एक दोघेजण आमच्या मागणीला विरोध करीत आहेत. मात्र, त्यांचा विरोध याचा अर्थ इतर सर्व समाजांचा विरोध असा होत नाही, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला. भुजबळांकडून केवळ राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण केली जात आहे, या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळवून दिले जाईल, अशी खात्री व्यक्त करतानाच जरांगे पाटील म्हणाले की, मराठा कुणबी नोंदी जमा करण्याच्या कामाला मात्र अधिक गती देणे गरजेचे आहे. काही जिल्ह्यांमध्ये हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. विशेषतः मराठवाड्यात या कामाची गती वाढविण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.