पुणे: प्रतिनिधी
मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची नितांत आवश्यकता असून राज्य सरकारने २० जानेवारीपर्यंत आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास सध्या राज्य पातळीवर असलेले मराठा आरक्षण आंदोलन देशव्यापी केले जाईल, असा इशारा हरियाणामधील रोड मराठा समाजाने राज्य सरकारला दिला आहे.
पानिपत युद्धाच्या काळात जी मराठी कुटुंब मराठा सैन्यातून पानिपतला गेली त्यातील अनेक जण युद्धानंतर त्याच ठिकाणी स्थायिक झाले. त्यांच्या अनेक पिढ्या हरियाणात रुजल्या असल्या तरीही त्यांनी आपली संस्कृती जतन केली आहे. या समाजाला हरियाणा रोड मराठा म्हणून ओळखले जाते.
दरवर्षी पानिपत येथे होणाऱ्या पानिपत शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे पुण्यातील इतिहासप्रेमींना निमंत्रण देण्यासाठी आलेल्या रोड मराठा समाजाच्या प्रतिनिधी मंडळांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
राज्याच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत मराठा समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सध्या मराठा समाजाला प्रगतीपथावर राहण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. या बाबीचा विचार करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावे. अन्यथा देशाच्या सर्व भागात विखुरलेला मराठा समाज एकत्र येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देशव्यापी आंदोलन उभे करेल, असा इशारा रोड मराठा प्रतिनिधी मंडळांनी दिला आहे.