मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो आंदोलन मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले असताना अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबाच्या सग्यासोयऱ्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे ची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी या याचिकेतील प्रमुख मागणी आहे.
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा कुटुंबीयांना त्यांचे सगेसोयरे आणि गणगोत सह इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर इतर मागासवर्गीयांच्या संघटना आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात न्यायालयात आणि रस्त्यावर संघर्ष करण्याची तयारी या संघटनांनी केली आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून फाउंडेशनच्या वतीने ॲड. मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरेची व्याख्या बदलता येणार नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.