छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला घरचा आहेर
नाशिक: प्रतिनिधी
इतर मागासवर्गीय संवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दबावाला बळी पडून सरकार त्याची अंमलबजावणी करणार असेल तर इतर मागासवर्गीय समाजही मतदानावर बहिष्कार घालेल, असा गंभीर इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या सरकारला दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही हे आपण वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गातूनच आरक्षण मिळावे असा मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांचा अट्टाहास आहे. या दबावाला बळी पडून तसा निर्णय झाल्यास इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट असलेल्या छोट्या जातींच्या पदरी काहीच पडणार नाही.
इतर मागासवर्गीय संवर्गात तब्बल ३७४ जाती आहेत. एकूण ५४ टक्के आरक्षणापैकी २७ टक्के आरक्षण इतर मागासवर्गीय यांना मिळावे अशी आपली मागणी आहे. त्यापैकी अद्याप दहा टक्के आरक्षणही मिळालेले नाही. त्यात मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय झाल्यास कोणालाच काही मिळणार नाही, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या आरक्षित जागांमध्ये इतर कोणाला स्थान दिले जाते का? मग मराठा समाजाला इतर मागासवर्गीय संवर्गातून आरक्षण देण्याचा अट्टाहास का, असे सवालही भुजबळ यांनी केले. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे अशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतेक नेत्यांची असून त्याला आपलाही पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.