मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशरचा पाठिंबा दिला आहे. मनसेचे नेते आणि पदाधिकारी महायुती उमेदवारांच्या प्रचार मोहिमेत देखील सहभागी होतील. तशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात, आल्या आहेत, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ठाकरे हे पत्रकारांशी बोलत होते. मनसे नेते आणि पदाधिकारी प्रचारात सहभागी होणार असले तरीही खुद्द राज ठाकरे महायुतीच्या प्रचार सभांमध्ये भाषणे देणार का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांच्या काही धोरणांना आपण विरोध केला. मात्र एकूणच मोदी यांनी आपल्या कार्यकाळात देशातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यापैकीच एक मुद्दा अयोध्येतील राम मंदिराचा आहे. राम मंदिरासाठी च्या आंदोलनात अनेक कार्य सेवकांनी छातीवर गोळ्या घेतल्या आहेत. त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकून देण्यात आले. त्यांचे बलिदान विसरण्यासारखे नाही. मंदिरा बाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरीही त्याची अंमलबजावणी केवळ मोदी पंतप्रधानपदी असल्यामुळे झाली आहे. अशा धडाडीच्या निर्णयामुळे मोदी यांना आणखी एक संधी द्यायला हवी, या विचारातून आपण आणि आपल्या पक्षाने मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे ठाकरे यांनी सांगितले.
या पुढील काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संरक्षण असे महाराष्ट्राचे महत्त्वाचे विषय मोदी यांच्यापर्यंत पोहोचविणार असून मोदी हे प्रश्नही मार्गी लावतील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.