
पुणे: प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढाविणारे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना मनसेचे युवा प्रमुख अमित ठाकरे यांनी केली.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन मनसेने पाठींबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. महायुतीबरोबर प्रचार मोहिमेसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे, बाबू आगस्कर आणि किशोर शिंदे यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यामुळे वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यांना थेट पंतप्रधान व्हायचे आहे, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी मोरे यांची खिल्ली उडवली. लोकसभेची निवडणूक लढविण्यापेक्षा त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीचा प्रचार करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.