
३३ मावळ लोकसभा निवडणुकीसाठी २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यालयांतर्गत नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण दि.०५/०५/२०२४ व दि.०६/०५/२०२४ रोजी नुकतेच पार पडले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
नोडल अधिकारी, केंद्रप्रमुख, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. नोडल ऑफिसर, सेक्टर ऑफिसर यांनी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य कसे पार पाडावे, याबाबत मार्गदर्शन केले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हे निवडणूक प्रशिक्षण झाले. या निवडणूक प्रशिक्षणासाठी २६६९ प्रशिक्षणार्थी बोलविण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी करावयाचे कामकाज, व प्राप्त अधिकार तसेच इव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट हाताळणी, जुळणी याबाबत सर्व सेक्टर ऑफिसर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच मतदानाची वेळ संपल्यानंतर कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मोहोरबंद करणे, घोषणापत्र तयार करणे, प्रदत्त मतदान नोंदविणे, अंध, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, गैरहजर, स्थलांतरित, मृत मतदार, तृतीयपंथी, परदा नशीन, आक्षेपित मत नोंदविण्याबाबतची सहमतीपत्रे व घोषणापत्रे तयार करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदान संपल्यानंतर पुरूष, महिला, तृर्तीयपंथी व एकूण मतदान टक्केवारी यांची नोंद घेणे, नोंदविलेल्या मताचा हिशोब, केंद्राध्यक्षाची दैनंदिनी, पीएस ०५, केंद्राध्यक्षांचा छाननी तक्ता, केंद्राध्यक्षांचा अहवाल १ ते ५ आणि १६ मुद्यांचा अहवाल भरणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.