मुंबई: प्रतिनिधी
निवडणुकांमध्ये मतदानासाठी जोपर्यंत ईव्हीएमचा वापर केला जात आहे तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित आहे. मतदान यंत्र हटवली तर मोदीही हटणार हेही निश्चित आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
चंदीगड येथील महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान यंत्र आणि भाजप यांच्यातील साटेलोटे पुन्हा अधोरेखित झाले आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आठ मते अवैध ठरवून भाजपाने त्या ठिकाणी आपला महापौर निवडून आणला आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
अनेक ठिकाणी मतदान यंत्र ही भाजप पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याची टीकाही त्यांनी केली. आसाम मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या ट्रकमध्ये ३०० तर उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या दुकानात २०० मतदान यंत्र आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप आणू पाहत आहे चंदीगड पॅटर्न
भाजपा सरळ मार्गाने निवडणुका जिंकू शकत नाही, याची त्यांना पक्की खात्री आहे. त्यामुळे हा पक्ष देशभरात चंदिगड पॅटर्न आणू पाहत आहे. ईव्हीएमचे उत्पादन करणाऱ्या भारत इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये भाजपाने आपले पदाधिकारी पेरले आहेत. त्यामध्ये बहुतांश भरणा गुजराती लोकांचा आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.