
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 400+ या नाऱ्याने जनता धास्तावलेली आहे, लोकसभा निवडणुकीत रालोआ आणि महायुतीची वाटचाल सोपी नाही, महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, अशी विधाने करून महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या उरात धडकी भरवली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यास विलंब झाल्यामुळे ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणारे छगन भुजबळ यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही खळबळजनक विधाने केली आहेत. छगन भुजबळ हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत एवढेच नव्हे तर, इतर मागासवर्गीय समाजाचे नेते म्हणूनही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानांना अधिक महत्त्व प्राप्त होते.
… म्हणून घेतली निवडणुकीतून माघार
आपण आयुष्यात प्रथम फक्त एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली. त्यानंतर कधीच कोणाकडे उमेदवारी मागायला गेलो नाही. या निवडणुकीतही नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही. पक्षानेच मला या ठिकाणाहून निवडणूक लढविण्याचे निर्देश दिले होते. वास्तविक, या मतदारसंघात आपल्या पुतण्याने खासदार पद भूषविले असले तरीही त्यानंतर दोन वेळा शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. त्यामुळे ही जागा त्यांनाच लढवू द्या, असे आपले म्हणणे होते. मात्र, पक्षाने सूचना दिल्याप्रमाणे आपण लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. दीर्घ प्रतीक्षेनंतरही आपली उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय आपण घेतला, असे भुजबळ यांनी या मुलाखतीत सांगितले.
मोदींवर जनतेचा भरवसा, तरीही…
भारतीय जनता पक्षाला घटना बदलायची आहे. त्यासाठीच त्यांना लोकसभेच्या 400 हून अधिक जागांवर विजय हवा आहे, असा प्रचार इंडिया आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. खुद्द भाजपचे कर्नाटकमधील खासदार आनंद हेगडे आणि राजस्थानातील खासदार ज्योती मिर्धा यांनी देखील संविधान बदलण्याची भाषा केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात याबद्दल भीती निर्माण झाली आहे, असा दवा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे तेच पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी लोकांची इच्छा आहे, असेही भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाची वाटचाल महायुती आणि रालोआसाठी सोपी असणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.