Home India भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्यांना संरक्षणमंत्र्यांची सक्त ताकीद

भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्यांना संरक्षणमंत्र्यांची सक्त ताकीद

भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्यांना संरक्षणमंत्र्यांची सक्त ताकीद

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

भारतीय मर्चंट नेव्हीच्या जहाजांवर हल्ले करणारे हल्लेखोर समुद्राच्या तळाशी जाऊन लपले तरी त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

भारतीय बनावटीच्या आयएनएस इंफाळ युद्धनौकेचे जलावतरण संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. आयएनएस इंफाळ ही भारतीय नौदलाने आरेखन आणि विकसन केलेली विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी युद्धनौका आहे.

शनिवारी पोरबंदर पासून सुमारे २१७ सागरी मैलांच्या अंतरावर एमव्ही केम प्लुटो या व्यापारी जहाजावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने संरक्षण देऊन हे जहाज मुंबई बंदरावर सुरक्षितपणे आणून ठेवले. दुसऱ्या एका घटनेत दक्षिणी तांबड्या समुद्रात कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या एमव्ही साईबाबा या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला.

या घटनांची संरक्षण विभागाने काटेकोरपणे दखल घेतली असून व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी सागरी गस्तीत वाढ करण्यात आली आहे. सागरी चाचे आणि ड्रोन हल्ले यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी चार विनाशिका तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय पी ८ आय विमाने, डोर्नियर, सी गार्डियन, हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची जहाजे त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आली आहेत.