चिंचवड 16 ः भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक विभागातर्फे वार्षिक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विज्ञान, वाणिज्य, भूगोल गणित, रांगोळी पोस्टर्स, ग्रीटिंग्स यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विज्ञान व तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन, मॉडेल्स, चार्ट्स याद्वारे विद्यार्थ्यांनी दिली. मूलभूत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगितल्या. नववर्षाचे स्वागत करणारे ग्रीटिंग्स वैविध्यपूर्णरित्या तयार केले. पर्यावरण रक्षण आणि आहारातील तृणधान्याचे महत्त्व विशद केले. गणितातील अवघड संकल्पना सोप्या करून सांगितल्या. वैज्ञानिक रांगोळ्या तसेच, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, जल है तो कल है ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण टाळा या विषयांवर रांगोळ्या काढून विद्यार्थिनींनी सामाजिक भान जपले.
वाणिज्य प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बँक कार्यप्रणाली, विमा, कंपनी, नेट बँकिंग, ई कॉमर्स, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन शॉपिंग इत्यादी विषयी मार्गदर्शन करणार्या विविध प्रतिकृती तसेच तक्ते याद्वारे दैनंदिन व्यवहारात वाणिज्य शाखेचे महत्त्व पटवून दिले.
दैनंदिन जीवनात विज्ञान, तंत्रज्ञान पर्यावरण, गणितीय संकल्पना, कला आणि वाणिज्य यांची योग्य सांगड घालणे किती महत्त्वपूर्ण आहे हे या प्रदर्शनातून अधोरेखित झाले.
विद्यालयातील युवा शास्त्रज्ञ सोहम नेहरे तसेच इन्स्पायर अवॉर्ड मिळालेली सलीना शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वेदांत पवळे आणि गीत जामदळ या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यावर पावर पॉइंट प्रेझेंटेशनव्दारे उत्तम भाष्य केले.
या प्रदर्शनास शालेय प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंखे, भारतीय जैन संघटना समिती सदस्य सुभाष ललवाणी, डी.वाय. पाटील इंटर डिसिप्लिनरी रिसर्च डायरेक्टर डॉ. चंद्रशेखर राऊत, शास्त्रज्ञ नारायणन अलवार सुभाष बाफणा तसेच भारतीय जैन संघटना महाविद्यालय प्राचार्य डॉ. एस. डी. गायकवाड, वाघोली शाखा प्रा. संतोष भंडारी, पिंपरी शाखा प्राचार्य दिलीप देशमुख व उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक संजय जाधव या मान्यवरांनी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक व विज्ञान विभाग प्रमुख नीलिमा ब्रम्हेचा त्यांनी केले.
उच्च माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत व्हाव्या यासाठी अशा उपक्रमांची गरज असते असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.